अमृतकाळ हा विकासाच्या गरुड भरारीसाठी योग्य वेळ..
अमृतकाळ हा विकासाच्या गरुड भरारीसाठी योग्य वेळ..
मुंबई, दि. ११ डिसेंबर :
अनेक देशांनी आपल्या इतिहासात सर्वांगीण विकासासाठी एकदा निर्धाराने गरुड भरारी घेतली व ती राष्ट्रे आज विकसित राष्ट्रे म्हणून नावारूपाला आली आहेत. स्वातंत्र्याचा अमृतकाळ ही विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याकरिता गरुड भरारी घेण्याची योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला पंतप्रधानांनी यावेळी संबोधित केले.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षक, विद्यापीठे व शिक्षण संस्थांवर आहे त्यांनी अमृत काळातील एकही क्षण वाया जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. अधिकाधिक युवकांना विकसित भारत संकल्पनेशी जोडण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या स्तरावर अभियान चालवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. विकसित भारत अभियानातून देशाला नेतृत्व प्रदान करणारी अमृत पिढी घडवायची आहे असे त्यांनी सांगितले.
केवळ शिक्षण व कौशल्यातून अमृतपिढी निर्माण होणार नाही तर उत्तम नागरिक होण्याकरिता सर्वांनी रहदारीचे नियम पालन करणे, तसेच उद्योजकांनी देशातील उत्पादनांची गुणवत्ता सर्वोत्तम राहील या दृष्टीने प्रयत्न करणे देखील आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आज जगातील काही देशांची लोकसंख्या वृद्धतेकडे झुकत आहे. अशावेळी युवा राष्ट्र असलेल्या भारताकरीता पुढील ३० ते ४० वर्षे महत्वाची आहेत असे सांगून विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक युवकाकडे किमान एक तरी कौशल्य राहील याची खातरजमा विद्यापीठांनी करावी असे पंतप्रधानांनी सांगितले.
