एसटी कर्मचारी बँकेची अवस्था दयनीय…
एसटी कर्मचारी बँकेची अवस्था दयनीय…
नागपूर, दि. ११ डिसेंबर :
एसटी बँकेची अवस्था दयनीय असून राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. त्याला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी आ. अनिल परब यांनी एसटी कर्मचारी बँकेचा प्रश्न मांडला. या चर्चेत सहभागी होत आ. प्रविण दरेकर म्हणाले की, हा विषय केवळ बँकेपुरता मर्यादित नाही तर जे एसटीचे कामगार आहेत त्यांच्या पगाराशी निगडित आहे. एसटी कर्मचारी बँकेत ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या नियमबाह्य झाल्या आहेत. सरकारने चौकशीचे आदेश दिलेत. परंतु सहकार मंत्र्यांनी यात स्वतः लक्ष घालावे. कारण बँकेचा रेशो वाढलाय. ६५ च्या आसपास रेशो असायला हवा तो ८५ च्या वर गेलाय. त्यामुळे बँकेची अवस्था दयनीय आहे. आपण अधिकार रिझर्व्ह बँकेला दिले आहेत पण रिझर्व्ह बँक ना सुनावणी घेत ना नोटीस पाठवत. डायरेक्ट प्रशासकाची नियुक्ती करते, याबाबतही शासन स्तरावर विचार करावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, बँकेची परिस्थिती अजूनही चांगली आहे. जवळपास १८४४ कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. आता जो एमडी नेमायचा असतो त्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे आणि रिझर्व्ह बँकेने जे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत ते सरकारने दिलेले नाही. त्यांनी कायदा करून स्वतःकडे घेतलेत. ही एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बाब आहे. एसटी कर्मचारी बँक सुरक्षित राहावी, प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार लक्ष घालून वेळोवेळी जे काही निर्णय घ्यायला हवेत ते घेईल, असेही वळसे-पाटील यांनी आश्वस्त केले.
