कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजारांचा भाव द्या.
कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजारांचा भाव द्या.
नागपूर, दि. ८ डिसेंबर;
विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे विदर्भातील प्रमुख पिकांपैकी कापूस हे एक पीक आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आमचे महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही १४ हजारापर्यंत भाव दिला होता. यावर्षी कापसाला केवळ ७ हजार रुपये भाव देण्यात आला आहे. कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
सोयाबीनचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जे हमीभाव जाहीर केले आहे ते फक्त ४ हजार २०० रुपये आहे. दहा वर्षांपूर्वी भाजप विरोधी पक्ष असताना त्यावेळी भाजपच्या वतीने माजी आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वात शेतकरी दिंडी काढली होती. त्यावेळी सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली मागणी पूर्ण केली नाही आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. कापसाला व सोयाबीनला कशाप्रकारे चांगला भाव मिळेल याबाबतीत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे.
महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता सभागृहामध्ये चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार देखील बोलायला तयार नाही आणि अध्यक्ष यांनी देखील परवानगी दिली नाही.
