कांदा निर्यात व इथेनॉल निर्मिती वरील बंदी रद्द करा..
कांदा निर्यात व इथेनॉल निर्मिती वरील बंदी रद्द करा..
नागपूर, दि. ८ डिसेंबर :
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मितीस बंदी मुळे कांदा शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने यावर लवकरच भूमिका घ्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. आज सभागृहात शेतकऱ्यांची बाजू मांडताना, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क होतं. पण, सरकारने गुरुवारी निर्यात बंदी जाहीर केली आहे. इथेनॉल प्रॉडक्टमध्ये बदल झाले आहेत. इथेनॉल निर्मितीवर पुन्हा बंदी करण्यात आली आहे, त्यामुळे ऊस उत्पादक निराशेत आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने प्रोत्सहन दिले. शेकडो कोटी रुपये खर्च करून इथेनॉलचे प्लांट उभे केले. आता मात्र उसाच्या रसापासून आणि बी हेवी पासून तयार झालेले इथेनॉल घेणे पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. स्वतः धोरणे तयार करून मागे हटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे.
बांगलादेश मध्ये निर्यात होणाऱ्या संत्र, केळी, द्राक्षे यांसारख्या फळांवर प्रचंड आयात कर लावलेला आहे. बलशाली भारत बांगलादेशशी याबाबतीत वाटाघाटी करू शकत नाही का? शेतकऱ्यांसाठी कुचकामी धोरणे तयार करणाऱ्या केंद्र सरकारपुढे राज्य सरकार हतबल आहे, हे आपले दुर्दैव.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर ताबडतोब चर्चा व्हावी अशी आम्ही मागणी केली. मात्र ही चर्चा होऊ न देणं यात सत्तारूढ पक्षाने मोठेपणा मानला. विरोधकांची संख्या कमी असली तरी ते मांडत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे. सरकारने यातून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती निर्यातबंदीमुळे पूर्णपणे ठप्प होणार आहे. संत्रा निर्यातीवर बांगलादेशने आयातशुल्क लावले आहेत. कापसाला भाव नाही. या राज्यातील सर्व शेतीमालाच्या निर्यातीचे मार्ग केंद्र सरकार बंद करत आहे, त्यामुळे राज्य सरकारने कांदा निर्यात बंदीबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रोत्साहन दिलं. अनेक साखर कारखान्यांनी गुंतवणूक केली आहे. देशाला लागणाऱ्या साखरेपेक्षा जास्त साखर असूनही इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा फार दर मिळण्याची शक्यता होती. तीही आता संपुष्टात आली आहे, त्यामुळे इथेनॉल संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार. कांदा निर्यात पुन्हा चालू करण्यासाठी सरकार काय करणार, याचा खुलासा करावा. असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
