शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.
बीड दि. ६ डिसेंबर;
मराठवाडा व बीड जिल्हा दुष्काळामुळे संकटात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एक रुपामध्ये पीकविमा योजना सुरु केली. राज्य सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने मराठवाड्यामध्ये ‘नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजने’चा दुसरा टप्पा सुरु केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा लाभ होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु केली. या योजनेच्या पहिल्याच टप्प्यात बीड जिल्ह्यासाठी 30% फिडरचे टेंडर काढले आहे. आगामी दोन ते अडीच वर्षात बीड जिल्ह्यातील सर्व फिडर हे सोलरचे असतील व शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल.
कृष्णा- मराठवाडा योजनेसाठी ₹11 हजार 400 कोटींची सुप्रमा राज्य सरकारने काढली आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आमचा निर्धार पक्का आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून पुढील काही काळात या योजनेच्या माध्यमातून सरकार मराठवाड्याला दुष्काळमुक्त करेल.
महायुती सरकारने महाराष्ट्रातील मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरु केली आहे. मुलगी जन्माला आल्यास ₹5000, पहिल्या वर्गात गेल्यास ₹5000, 7व्या वर्गात गेल्यास ₹8000, 11व्या वर्गात गेल्यास ₹8000, मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यास ₹75000 असे एकूण ₹1 लाख सरकार देणार आहे. ज्या घरात मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
याचबरोबर माता-भगिनींना एसटीच्या प्रवासात 50% सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यासह ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेंतर्गत ₹5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले असून यामध्ये कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, आशा सेविका यांच्या मानधनामध्ये ₹1500 ते ₹1700 वाढ केली आहे. निराधार लोकांची पेंशन ₹1000 ऐवजी ₹1500 केली आहे.
केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करेल. याठिकाणी जो कॉरिडॉर तयार करायचा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महायुती सरकार सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे काम करत असून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही आराम करणार नाही.
