यशवंतराव चव्हाण एक आदर्श व्यक्तिमत्व..
यशवंतराव चव्हाण एक आदर्श व्यक्तिमत्व..
मुंबई दि. २५ नोव्हेंबर :
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाची कामगिरी करणारे आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्याचा अर्थ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेन याची खबरदारी आयुष्यभर घेणारे ज्यानी प्रयत्नांची पराकाष्टा केली असे व्यक्तिमत्व म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज ३९ वी पुण्यतिथी त्यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम पार पडला आहे. या निमिताने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. सन्मानमूर्ती डॉ. यशवंत मनोहर, पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संस्थेच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, सरचिटणीस हेमंत टकले, न्यायमूर्ती विजेत शेट्टी, अन्य सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तसेच, देशाचे संरक्षक मंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, मग उपपंतप्रधान म्हणून अनेक राजकीय जबाबदाऱ्या ज्यांनी समर्थपणे सांभाळल्या आणि हे सर्व करत असताना सामाजिक जीवनात एक आदर्श व्यक्तिमत्व चारित्र्य कसं असावे याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला अशा यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्मरण आपण त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने करत आहे असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, ही संस्था त्यांच्या नावाने स्थापन झाली आणि त्यांच्या विचारांचा प्रसार हा अखंड कसा होईल याची काळजी विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्यातून प्रकाशनातून या संस्थेच्या मार्फत घ्यायचा प्रयत्न करत असतो. मला आनंद आहे की त्यांनी जी भूमिका आयुष्यभर मांडली त्या भूमिकेसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा फार मोठा काळ दिला, विचारांनी दिला अशा मान्यवरांचा सन्मान हा आपण चव्हाण साहेबांच्या नावाने गेले अनेक वर्ष करत आहोत.
चव्हाण हे नेहमीच प्रागतिक विचारांचे पुरस्कर्ते होते. अत्यंत सामान्य कुटुंबातील होते आज ज्यांचा सन्मान आपण करत आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि चव्हाण साहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी यात काहीही अंतर नाही. एक गंमत म्हणून सांगायचे झाले तर चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांच्या कराड या गावी त्यांचे स्वागत झाले. मग ते घरी गेल्यावर त्यांनी त्यांच्या मातोश्रीचे दर्शन घेतले. त्यावेळी मातोश्रींनी त्यांना विचारले आज एवढी गर्दी का आहे ? त्यावर कोणी तरी बोलले की, राज्याचे मुख्यमंत्री आले आहेत. त्यावर त्या माऊलीने विचारले की, मुख्यमंत्री म्हणजे कोण ? आपल्या गावचा तलाठी ग्रामसेवक त्यापेक्षा मोठा झाला का ? त्या माऊलीला यापलीकडे काहीच माहिती नव्हतं ही त्यांची पार्श्वभूमी होती. अशा पार्श्वभूमी मध्ये ज्यांचा जन्म झाला ते राष्ट्राचे नेते झाले आणि आज आपण ज्यांचा सन्मान करतोय त्यांचा जन्म त्यांच जीवन कार्यक्रम हा अशाच पार्श्वभूमी मध्ये झाला पण त्या सर्व परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कर्तुत्वाने उभ राहण्याची भूमिका ज्यांनी अखंड प्रयत्नांनी केली अशा व्यक्तींच नाव घ्यायचे असेल तर ते डॉक्टर मनोहर यांचे नाव हे घेतल्याशिवाय ती व्यक्ती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मला आनंद आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारला.
आपले उभे आयुष्य याच विचारांसाठी त्यांनी घालविले त्यांनी केलेले लेखन या विचारांना शक्ती देण्याचे होते त्यांनी केलेलं कार्य या विचारांना प्रोत्साहित करणारे होते. ही सगळी भूमिका घेऊन आज तुम्ही या ठिकाणी जी भूमिका मांडली ती चव्हाण साहेबांच्या विचारांची अत्यंत सुसंगत अशी विचारधारा होती. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने तुमचे अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एकेकाळी अनेक वर्ष या संस्थेमध्ये ज्यांनी मार्गदर्शनाचे काम केले ते देशाचे माजी न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो एडवोकेट विजेत शेट्टी यांना या ठिकाणी प्रधान करण्यात आला त्यांची ही निवड या ठिकाणी झाली त्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो तुम्ही सर्वजण आस्थेने या ठिकाणी या प्रागतिक विचाराला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
