IMG-20230927-WA0057

नॅशनल हेराल्डवर सुडबुद्धीने कारवाई:

मुंबई, दि. २२ नोव्हेंबर;

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे मात्र लोकांनी पाठ फिरवलेली आहे. भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर ईडीची कारवाई केली आहे, पण काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत, यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने नॅशनल हेराल्डवर कारवाई करत आहे पण अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पराभव दिसू लागताच मोदी सरकार ईडीचा दुरुपयोग करून अशा प्रकारच्या कारवाया करून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही. संपूर्ण देशाला या प्रकरणाचे सत्य माहित आहे. यापूर्वीही याच प्रकरणात मा. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनाही चौकशीच्या नावाखाली बोलावून दहा-दहा तास बसवून नाहक त्रास देण्यास आला होता, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

नॅशनल हेराल्ड चालवणारी असोसिएटेड जर्नल या कंपनीकडून गांधी कुटुंबातील कोणाला किंवा कंपनीच्या कोणत्याही संचालकांना पगार किंवा नफा मिळत नाही. त्यामुळे त्यात काही घोटाळा झाला हा भाजपचा आरोप खोटारडा आहे. आता पाच राज्यातला दारूण पराभव समोर दिसत असल्याने भाजपने पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखला असून ईडीही भाजपला पराभवापासून वाचवू शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *