तेलंगणात काँग्रेसला वाढता पाठिंबा…
तेलंगणात काँग्रेसला वाढता पाठिंबा…
पालेर, तेलंगना, दि. २२ नोव्हेंबर:-
तेलंगणा राज्यात काँग्रेस पक्षाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असून पालेर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील “, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पालेर मतदारसंघाचे निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या प्रचारार्थ आज नेल्लाकोंडापल्ली या मंडळातील कोत्तुर या गावी पदयात्रेचे आणि प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देशमुख बोलत होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले,” राज्यात सर्व स्तरातून काँग्रेस पक्षाला मोठा पाठिंबा मिळत असून तेलंगणातील जनतेने सत्ता परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून तेलंगणातील बी.आर.एस. पक्षाची भ्रष्ट राजवट संपणार असुन राज्याच्या विकासासाठी तेलंगणातील जनता काँग्रेस पक्षाला सत्तेवर बसवेल.
पक्षाचे उमेदवार माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी म्हणाले,” या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने जनतेला सहा कलमी हमीपत्र दिले आहे. या हमीपत्रात उल्लेख केल्यानुसार महिला, युवक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,” असे आवाहन रेड्डी यांनी केले.भर उन्हात झालेल्या या पदयात्रेत महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
