उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन समजून घ्यावे.

0
images - 2023-11-10T193746.316

उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन समजून घ्यावे..

 

मुंबई, दि. १० नोव्हेंबर :-

मराठा आरक्षणाचे जे वातावरण निर्माण झालेय त्यावर आपली राजकीय पोळी भाजता येतेय का?असा केविलवाणा प्रयत्न उबाठा गटाचा सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता ती पोळी भाजू देत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात शेवटून पहिला क्रमांक उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आला आहे, त्यांनी आपले राजकीय मूल्यमापन काय आहे हे समजून घ्यावे, असे भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटले आहे.

 

पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर म्हटले की, आता चर्चा काही रंगू शकतील, चर्चा काही असू शकतील. अजित पवार आणि शरद पवार यांनाच माहित ते दिल्लीला कशासाठी जाताहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दिवाळी आहे. दिवाळीच्या स्नेहसंमेलनातही ते भेटू शकतात, राजकीय भेटही असू शकते. यावर मी कसे सांगणार त्यांच्या मनात काय उद्देश आहे? हे तेच किंवा त्यांच्या कुटुंबात जी बैठक झाली त्यापैकी कोणी सांगू शकेल. अनेक गोष्टी कौटुंबिक भेट झाल्यावर घडलेल्या आहेत. तशाच बिघडलेल्या आहेत. त्यामुळे यात नेमके काय होईल हे तेच सांगू शकतात.

 

बिहारचे किंवा नितीश कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याची, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची महाराष्ट्राला आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व सक्षम आहे. सर्व समाजाला बरोबर घेत सर्वांना आरक्षण द्यायची न्याय्य भुमिका महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाची आहे. किंबहुना याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता असणाऱ्या नेतृत्वात निश्चितपणे मराठा समाजाविषयी संवेदना आहेत. त्यामुळे कायद्यात टिकेल अशा प्रकारचे आरक्षण या सरकारला द्यायचे आहे. नितीशकुमार विधानसभेत काय बरळतात, त्यांच्या नैतिकतेचा काय ऱ्हास झालाय त्या नितीश कुमार यांची री ओढतांना अशोक चव्हाण दिसत असल्याचा टोला दरेकरांनी लगावला.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम करतेय. अगदी हैद्राबादला जाऊन आल्यापासून कधीच सरकार एवढ्या ऍक्शनमोडमध्ये आले नव्हते. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यलयात नोंदणी तपासण्याची लगबग दिसून येईल. जेवढे जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध करून देता येतील तेवढे सरकारने दिले आहे. अजून कर्मचाऱ्यांची गरज असेल तर हे सरकार मराठा समाजाप्रती संवेदनशील आहे.

 

यावेळी दरेकर यांनी संजय राऊत यांनाही टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे देशातील तरुण नेतृत्व आहे. स्टार प्रचारक म्हणून त्यांना महाराष्ट्राबाहेरही मागणी आहे. आता संजय राऊत यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतसुद्धा प्रचाराला बोलवत नाहीत याचे कदाचित दुःख त्यांना असेल. संजय राऊत हे बोलण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाहीत. ना कधी महारष्ट्राच्या प्रश्नावर, विकासावर, ना कधी सत्ताधारी पक्षाच्या होत असलेल्या चुकांवर नीट बोललेत. त्यामुळे संजय राऊत केवळ बोलघेवडा म्हणूनच महाराष्ट्र, देशासमोर माहित आहे. मध्य प्रदेशात जर देवेंद्र फडणवीस यांच्या सभा असतील तर त्यांनी जायचे नाही का? मातोश्री सारखं घरात बसून ऑनलाईन संबोधित करायचे? असा सवालही दरेकर यांनी केला.

अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, ते ज्या पक्षातून येतात त्या पक्षाची आरक्षणाच्या बाबतीत काय भुमिका होती हे महाराष्ट्रला सर्वश्रुत माहित आहे. पक्षप्रमुखांनी घेतलेली भुमिका महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात सातत्याने भुमिका शिवसेना उबाठा पक्षाची राहिलेली आहे. आता आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतोय.

हे सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. शिंदे समिती नोंदणी तपासत आहे. मराठा आरक्षणबाबत आम्ही ठाम आहोत हे पुन्हा पुन्हा सांगताहेत. कायद्यात टिकेल असे आरक्षण देण्याची भुमिका आहे. सरकार आरक्षणाबाबत शंभर टक्के सकारात्मक असताना चालढकल कशी काय म्हणता येईल. आरक्षणाच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे हाच उबाठा पक्षाला प्रॉब्लेम आहे. ह्यांची राजकीय दुकानदारी करायला वाव नाही हीच खरी पोटदुखी आहे.

जातीय जनगणनेबाबत भाजपाने भुमिका स्पष्ट केली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी संगितले की, याबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. योग्यवेळी योग्य तो निर्णय केला जाईल, असेही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *