प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी जागृती करा..
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी जागृती करा…
मुंबई, दि. ८ नोव्हेंबर –
वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना केले.
केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांशी दीपावलीमध्ये फटाके न फोडण्याच्या अनुषंगाने जागृती करण्याबाबत संवाद साधला. या ऑनलाईन संवादास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई विभागातील सर्व शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, दिवाळी हा सण आनंदाचा आहे. हा सण हर्ष आणि उल्हासात साजरा करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्व सांगण्यात यावे. ‘स्वच्छता मॉनिटर’ या कार्यक्रमामध्ये शाळांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगावे. शाळांनी परसबाग निर्माण करून परसबागेची निगा कशी ठेवावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.
