काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष..
काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष..
मुंबई, दि. ७ नोव्हेंबर:
काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपवाडा येथे व्यक्त केला.
आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली.समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत, त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाहीत. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
