जरांगे पाटलांनी राजकीय भाषा करू नये!
जरांगे पाटलांनी राजकीय भाषा करू नये!
मुंबई, दि. १ नोव्हेंबर ;
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले, कोर्टात टिकवले पण नंतरच्या सरकारने ते घालवले. तरीपण देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे दिलेले आरक्षण समाजाला माहित आहे, समाजाप्रती देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निश्चितच चांगली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भाषा वापरू नये, अशी विनंती भाजपा नेते प्रविण दरेकरांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणावरून जरांगे यांनी राजकीय भाषा करू नये. यामागे कुणी राजकीय धनी या आरक्षणावर स्वार होऊन, भरकटवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय का? जाळपोळीचे समर्थन आपण करणार आहात का? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. लाखोंचे मराठे मोर्चे शांततेत निघाले. नेतृत्व नसतानाही जगासमोर त्या मोर्चानी आदर्श निर्माण केला. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न हिंसेने आणि जाळपोळीने होता कामा नये.
