ससून ड्रग प्रकरणाची विशेष SIT चौकशी करा..
ससून ड्रग प्रकरणाची विशेष SIT चौकशी करा..
मुंबई, दि. १८ ऑक्टोबर :
पुण्याच्या ससूनमधील ड्रग रॅकेटचा मुख्य आरोपी ललीत पाटील याच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशिर्वाद आहे, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत, असे प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
विधान भवन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, ललीत पाटील धुळे, चाळीसगाव फिरून कर्नाटक मध्ये गेला. त्यानंतर चेन्नई येथे त्याला मुंबई पोलीसांनी अटक केली. त्यामुळे पुणे पोलीस काय करत होते हा प्रश्न आहे. ललित पाटीलला पकडले म्हणजे प्रकरण मिटले, असे होत नाही. त्याला कोणाची फूस होती, त्याला कोणी पळवले याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे रूग्णालयात ड्रगचा धंदा केला जातो. दुसरीकडे रूग्णांना औषध मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे. सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा होतो. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून पुण्याच्या ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य जनतेसमोर आले पाहिजे.
सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ललित पाटील पळून जाऊ शकत नाही. सरकार फक्त टेंडर काढण्यात व्यस्त असून सरकारला मलिदा खाण्याशिवाय उद्योग राहिला नाही. त्यामुळे असे अनेक ललित राज्यात मोकाट फिरत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत आहेत. याचा छडा सरकारने लावला पाहिजे. यासाठी विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
