डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत.

0
IMG-20231013-WA0088

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत.

येवला, दि. १४ ऑक्टोबर ;

येवला शहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून ८८ वर्षांपूर्वी धर्मांतराची घोषणा केली होती. १२ वर्षानंतर या मुक्तीभूमीस १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने जागतिक स्तरावर या स्थानाला महत्व प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच डॉ. बााबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत अशी सदिच्छा केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी केली.

येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापण दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हे सर्व जाती, धर्माला न्याय देणारे संविधान आहे. संविधानातून अखंड भारताची रचलेली लोकशाही जगभरात कौतुकास पात्र आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी मुक्तीभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना केली.

मुक्ती भूमीचे महत्त्व लक्षात घेवून सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १५ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.फेज १ अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल हे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तिर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. येवला मुक्तीभूमी स्मारक परिसरात फेज दोन अंतर्गत पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, लॅण्डस्केपिंग, आदी विकास कामे पूर्ण झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *