रावणराज सरकारला गांधी नावाची दहशत…
रावणराज सरकारला गांधी नावाची दहशत…
मुंबई, दि, ७ ऑक्टोबर,
केंद्रातील सरकारच रावणराज आणि रावण असून त्यांना गांधी नावाची दहशत वाटत आहे. भाजपला स्वतःची लंका जळत असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आमचे नेते राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी हिन पातळीवरील राजकारण सुरू केले आहे. काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण भाजपाने रावण वृत्तीने जनतेवर अन्यायकारक वागणुकीने अति केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा काँग्रेस पक्षाचे नेते विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
भाजपाच्या रावणप्रवृत्तीविरोधात काँग्रेसकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात सहभागी होवून वडेट्टीवार यांनी भाजपच्या कृतीचा निषेध केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड , माजी खासदार संजय निरूपम व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते,नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, भाजपाची लंका जळत आलेली आहे . भाजपने नऊ वर्षात देशात रावणवृत्तीने सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण केले होते आणि त्यांना त्रास दिला, त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा विकासाचे सोंग घेऊन बहरूपी बनून भारतीय जनतेचं व देशाचं वाटोळं केलं आहे. नऊ वर्षात भाजपने देशात रावणराज निर्माण केले आहे. महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषणाचाआरोप असलेल्या भाजपच्या खासदाराला पाठीशी घातले जाते. भाजप सत्तेत असलेल्या मणिपूरमध्ये तेथील आया बहिणींची धिंड काढली जाते पण तिकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही भाजप नेता याबाबत बोलत नाही.
बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांचा सत्कार केला जातो. हे रावणराज नाही तर काय आहे? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी देशातील लोकांना जोडण्यासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे घाबरले आहेत गांधी नावाची दहशत यांच्या डोक्यात घुसली आहे. म्हणून गांधींना बदनाम करण्याचं षडयंत्र ते करत आहेत. राहुलजींची बदनामी केल्याचा राग काँग्रेस कार्यकर्त्यां समवेत सर्वसामान्य जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महात्मा गांधीजी यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण भाजपाने रावण वृत्तीने जनतेवर अन्यायकारक वागणुकीने अति केले त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
