शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही ?
शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही ?
नागपूर, दि. ३ सप्टेंबर :
शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारल्या गेले. या हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना आता जालना येथील घटनेवर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
महाविजय २०२४ अभियानांतर्गत अकोला लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवार गेली ४० वर्षे सत्तेत असून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे तेच अनेकदा बोललेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला, तो सुप्रीम कोर्टात टिकविला. परंतु, शरद पवारांचे लाडके उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने सरकारची बाजू मांडली नाही. तेव्हा शरद पवार हेच सरकारचे कर्ते-धर्ते होते, असाही टोला त्यांनी लगावला.
देशात दंगली घडतील या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, हा देश भगवान तथागत गौतम बुद्धांचा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी दंगलीची भाषा करू नये अशी अपेक्षा आहे. मोदीजींच्या काळात या देशात दंगली घडविण्याची कुणाचिही हिम्मत नाही.
