डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे निधन!
गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली.
मुंबई, दि. १ सप्टेंबर २०२०:
लिंगायत समाजाचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते आज त्यांचे निधन झाले.
धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारे, समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीसाठी योगदान देणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी दिलेले विचार, कार्य पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ‘राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनामुळे एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांचे लाखो अनुयायी पोरके झाले आहेत. महाराजांनी आयुष्यभर राष्ट्र व समाजाच्या सेवेचे व्रत जोपासले. धर्माला विज्ञानाची जोड देण्यात त्यांनी वठवलेली भूमिका नेहमीच प्रेरणादायी असेल.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विरशैव परंपरा खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने रुजवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणमध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनाने विरशैव समाजाचा दिपस्तंभ हरपला. विरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यांच्या कार्यातून लिंगायत समाजाच्या कायम स्मरणात राहतील अशी श्रद्धांजली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्पण केली.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जीवनपट…..
डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म १९१७ मध्ये झाला. १९३२ साली वीर मठ संस्थान अहमदपूरचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाली. १९३८ साली आग्र्यातून साहित्य विशारदची पदवी प्राप्त केली तर १९४५ साली लाहोर विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले. १९४७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग दिला व यासाठी दोनवेळा तुरुंगवासही भोगला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यासमवेत त्यांनी काम केले. त्यानंतर अहमदपूर येथे परत येऊन त्यांनी धार्मिक कामात स्वतःला झोकून दिले. विरशैव तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, उर्दु, मोडी, पारसी, इंग्रजी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभृत्व होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. धार्मिक, सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही शिवाचार्य महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्यात शिक्षणाची गंगा पोहचवली..
