फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही !
फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही !
नाशिक, दि. १९ ऑगस्ट:-
समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचे असून शिक्षणाच्या प्रश्नावर सर्वांनी जातिभेद, मतभेद दूर करत सर्व समाजाने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मविप्र समाज दिन सोहळा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मखमलाबाद शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, संचालक रमेश पिंगळे, लक्ष्मणराव लांडगे, आप्पासाहेब पिंगळे, पंडिततात्या पिंगळे, प्रा.बाळासाहेब पिंगळे, शंकरराव पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, माजी नगरसेवक दामोदर मानकर, सुधाकर पिंगळे, सुरेश पिंगळे, तानाजी पिंगळे, अनिल काकड, निवृत्ती महाले, सनदी लेखापाल बस्ते, वाळूभाऊ काकड, रामदास पिंगळे, प्राचार्य डेर्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बहुजन समाजाला ज्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्या कर्मवीरांनी योगदान दिलं ही सर्व माझी दैवत आहेत. शिक्षणासाठी योगदान देणारे हे सर्व महापुरुष आपल्या सर्वांची दैवत असली पाहिजे असे सांगत आपण कुठेही गेलो तरी त्यांचे विचार कदापिही सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक समाजाचे विचार रुजविण्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांनी समाजात हे विचार रुजविले आजही त्या विचारांवर संस्थांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन समाजाला शिक्षण मिळण्यासाठी महात्मा फुले यांनी वाचा फोडली. पुढे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण मिळून देण्याचं काम केलं. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर, धार संस्थानचे श्रीमंत उदाजी पवार महाराज आदींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता विशद करून कृतिशील पावले टाकली असल्याचे त्यांनी सांगितले.
या महापुरुषांच्या विचारांतून प्रेरणा घेत जनतेचे कल्याण आणि आनंदासाठी सामाजिक हेतू जागृत करण्याचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीतून कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतदादा मोरे आदी समाजधुरिणांनी १९१४ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, आदिवासी, बहुजन समाजाला शिक्षित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. अनेकांच्या समर्पण, त्याग व योगदानातून ही संस्था यशोशिखरावर गेली असल्याचे सांगत त्यांना अभिवादन केले.
