पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत?
पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत?
बीड, दि १८ ऑगस्ट ;
मणिपूरमध्ये समाजात गावांत भांडणं झाली. अनेकांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. पण भाजप सरकार कोणतेही पाऊल उचल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. अधिवेशनात अवघे तीन मिनिटे बोलले. पण पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही. असा हल्लाबोल करत मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी का गेले नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली.या सभेमध्ये संबोधित करताना पवार म्हणाले की, चमत्कारिक लोकांच्या हातात आज सत्ता आहे. कष्टकऱ्यांबाबत त्यांना आस्था नाही. समाजात फूट पाडण्याची त्यांची भूमिका आहे. आज देशात किती प्रश्न आहेत. महागाई, खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेतकरी आज अडचणीत आहे. पण सरकारला चिंता नाही. सध्या देशात बसलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणंदेणं नाही. सध्याच्या घडीला न परवडणारी स्थिती ही शेतीची झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार हा सगळा वर्ग अडचणीत आहे आणि या केंद्र सरकारला त्याविषयीची चिंता नाही.
कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. समाजा समाजात भांडण झालं अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मणिपूरमधल्या भगिनींची दुर्दशा झाल्यानंतर आणि त्यांची घरदारं पेटवल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या समाजातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जाणं आवश्यक होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. संसदेचं अधिवेशन सुरु झालं तेव्हा फक्त तीन मिनिटं ते मणिपूरवर ते बोलले. अविश्वास ठराव आल्यानंतर चार ते पाच मिनिटं बोलले. मात्र तिथल्या भगिनींचं दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही. आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असेही शरद पवार साहेब यांनी बीडमधल्या सभेत बोलताना म्हटले आहे
लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याचे भूमिका घेते हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत.
सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत.
महाराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होतो त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होते. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की, नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला जमेल ते करावं लागलं पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे असेही शरद पवार यावेळी स्पष्टपणे म्हटले आहे
