शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत !
शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत !
जुजेरी, दि. ८ ऑगस्ट ;
‘शासन आपल्या दारी’ उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शासनाकडे जाण्याची गरज नाही, आता शासन आपल्या दारी आले आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी १०९ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बचत गटांना फिरते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला सक्षम होतील. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.
गावापर्यंत समृद्धी देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सांडपाणी शुद्ध करण्यात येणार असल्याने ते पाणी उद्योगांना दिल्यावर सिंचनासाठी पाणी टंचाई भासणार नाही.
पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी उद्योग, शेती अशा सर्वांनाचा नवीन विमानतळाचा फायदा होणार आहे. यामुळे मोठे निर्यात केंद्र येथे उभे राहू शकते. सर्वांच्या अडचणी दूर करुन विमानतळ देऊ शकल्यास पुण्याचे पुढच्या २० वर्षाची प्रगती निश्चित होईल. असेही फडणवीस म्हणाले.
