फडणवीस ‘मास्टरमाईंड’ नेते तर उद्धव ठाकरे घरकोंबडा !
फडणवीस ‘मास्टरमाईंड’ नेते तर उद्धव ठाकरे घरकोंबडा !
मुंबई, दि. ८ ऑगस्ट –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक पक्षांना एकत्रित घेऊन विकासाचे क्लस्टर निर्माण करणारे ‘मास्टरमाईंड’ नेते आहेत. उद्धव ठाकरे हे घरकोंबडा असून घरात बसून आरवायचे काम करत असतात. ते कर्तव्यशून्य आणि क्षमताहीन आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांना चितपट केले आहे त्या नैराश्येतून घरकोंबड्याची अशा प्रकारची वक्तव्ये येत आहेत अशी घणाघाती टीका भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा मस्टरमंत्री असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टिकेला भाजपा नेते व विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणण्यापर्यंत उद्धच ठाकरेंना वैफल्य आले आहे. त्यांच्या नाकाखालून एक वर्षांपूर्वी सरकार काढून घेतले तो बूस्टर डोस जो त्यांना लागलाय त्यातून ते बाहेर येताना दिसत नाहीत. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक पक्षांना एकत्रित घेऊन विकासाचे क्लस्टर निर्माण करणारे मास्टरमाईंड नेते आहेत.
राज्याच्या हितासाठी ५ वर्ष मुख्यमंत्री राहिलेला नेता उपमुख्यमंत्री पदावर बसवून घेतले. मोठे मन दाखवले. एवढेच नाही तर हे राज्य आणखी मजबूत व्हायला पाहिजे तर दुसरे उपमुख्यमंत्री आपल्या सोबत ठेवण्याचे औदार्य केवळ फडणवीस यांच्यासारखा नेताच दाखवू शकतो. खुर्चीपेक्षा मला सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचे हित साधले पाहिजे ही भुमिका फडणवीसांची आहे. उद्धव ठाकरे एक उपमुख्यमंत्री राज्याला देऊ शकले नाही. फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी सातत्याने आपला उपमुख्यमंत्री द्या ही मागणी भाजपाकडून, फडणवीसांकडून होत असताना एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री करावे लागेल या कोत्या मनाने उपमुख्यमंत्री पद देऊ शकले नाहीत, अशी टिकाही दरेकरांनी केली.
मोदींबाबत औकात नसताना टोकाचे, द्वेषाचे, मत्सराचे बोलण्याचे काम उद्धव ठाकरेंचे आहे. प्राईममिनिस्टर ऑफ इंडिया बोलत असताना इंडियन मुजाहीद्दीनचे प्राईममिनिस्टरआहात का? अशा प्रकारचे बालिशपणाचे वक्तव्य मोदी द्वेषातून केलेले दिसून येते. पंतप्रधान मोदींनी भारताचे वैभव जगाच्या, सातासमुद्रा पलीकडे नेऊन ठेवले आहे. विश्वगुरु म्हणून जगभरात त्यांची प्रशंसा होतेय. जगाची ५ वी अर्थव्यवस्था म्हणून देशाला उच्चस्थानी नेण्याचे काम करताहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या संकुचित वृत्तीच्या विचारांना देशवासीय किंमत देणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण उद्धव ठाकरे यांनी केले औरंगजेबी प्रवृत्ती आपल्या मनात, नसानसान्त भरली आहे. राममंदिर बाबत बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. कोविड काळात राम मंदिराचा जल्लोष करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले होते. हे महाराष्ट्र विसरलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष तुमचे ओझे वाहिले ही सगळ्यात मोठी चूक झाली.
