सर्वांना परवडणा-या कॅन्सर हॉस्पिटल्सची गरज !

0
IMG-20230730-WA0098

सर्वांना परवडणा-या कॅन्सर हॉस्पिटल्सची गरज !

ठाणे, दि. ३१ जुलै ;
आजच्या काळाची गरज उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आहेत. आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव आहे. इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. सध्याच्या काळात कॅन्सर हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. सर्वांना जवळ पडेल आणि परवडतील अशी कॅन्सर हॉस्पिटल राज्यात होणे गरजेचे आहे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

मानवाची बदलती दिनचर्या (लाईफ स्टाईल) आणि सायकोसोमॅटिक आजारांमुळे हे सगळे होत आहे. कॅन्सर हॉस्पिटल हे सेवा कार्य आहे. आजच्या जीवनात संवेदना महत्त्वाची आहे. आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. आपण चांगले दिले तर आपल्याला चांगले मिळविता येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो. चांगले केले तरच चांगले होईल, यावर विश्वास ठेवायलाच हवा. सर्वांच्या आयुष्यातून दुःख जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

आपल्या देशात प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने पाहिली जाते. पवित्रता, चैतन्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिवकार्य हीच जीव सेवा आहे. मीच केले हे मनात कधीही न आणता केवळ सेवा कार्य करणे आवश्यक आहे. ज्यांची सेवा करतोय त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांना अजून काय चांगले देता येईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

जेव्हा संपूर्ण जग कोरोनापुढे हातबल झाले होते, त्यावेळी भारतात सर्वजण एकजुटीने कोरोनाविरुद्ध उभे राहिल्याचे चित्र दिसले. सर्वांनी मिळून विश्वासाने एका ध्येयाने त्या संकटाशी मुकाबला केला. चांगल्या कामांमुळे समाज घडतो. समाज व देश बदलतोय. देशात नि:स्वार्थी भावनेने मोठ्यात मोठी व सामान्य व्यक्ती देखील समाजासाठी आणि देशासाठी चांगले काम करीत आहे. नजिकच्या काळात आपला देश सर्व चांगल्या बाबतीत पुढे असेल.  यातूनच आपला देश निश्चितच सर्व जगाला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी  शेवटी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष अजय आशर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टने विविध क्षेत्रात केलेल्या सेवाकार्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *