धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल राज्यासाठीही महत्त्वाचे

0
IMG-20230730-WA0103

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल राज्यासाठीही महत्त्वाचे.

ठाणे, दि. ३१ जुलै :-

माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.

परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले दुःख मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू होईल. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. ३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केली होती. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *