मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांशी सहकुटुंब भेट !

0
IMG-20230722-WA0074

मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांशी सहकुटुंब भेट !

नवी दिल्ली, दि. २३ जुलै ;

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली.

कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली

गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *