इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींची आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट !
इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींची आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट !
मुंबई, दि. २० जुलै –
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे काल मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची कळंबोलीतील MGM हॉस्पिटल आणि चौक येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन आरोग्य मंत्री डॉ प्रा तानाजी सावंत यांनी विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. जखमींवर जे आवश्यक आहेत ते सर्व उपचार केले जातील. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
खालापूर तालुक्यातील चौक येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराचाही आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी तिथे उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी काल मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली.
रायगडमधल्या खालापूरच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय यंत्रणा अलर्ट ठेवण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले.
