‘मंदिरे बंद’चा निर्णय केंद्र सरकारचाच….!
मुंबई, दि. ३० ऑगस्ट २०२०:
राज्यातील मंदिरे उघडावीत अशी मागणी मागील काही दिवसापासून जोर धरु लागली आहे. वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर भारतीय जनता पक्षानेही ‘मंदिर उघडा’ या मागणीसाठी काल राज्यभर ‘घंटानाद’ आंदोलन केले आणि दारुची दुकाने, मॉल्स उघडता तर मग मंदीरे का उघडत नाहीत, असा थेट सवाल ठाकरे सरकारला केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंदीर उघडा मागणीवर खरमरीत उत्तर दिले आहे, मंदिरे बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचाच होता. काही राज्यात मंदिरे उघडली त्याचे परिणाम काय झाले ते सर्वांनी पाहिले आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन होण्यापूर्वी आणि नंतर अनेकांना कोरोना झाला. पुजारीही त्यातून सुटले नाहीत. तिरुपती बालाजीचे मंदिर उघडले, तिथेही काय झाले हे माहीतच आहे, असे राऊत म्हणाले.
कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की करोना ही देवाची करणी आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. मंदिरे सुरू व्हावीत म्हणून देवासाठी शिवसेनाही झगडत आहे. मंदिराचेही एक अर्थकारण असून यावर अनेक कुटुंब जगत आहेत. मंदिराभोवती अनेक दुकाने सुरू असतात, त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळतो. मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, राजकारणाचा नाही, असेही ते म्हणाले.
