उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे घसरले….

0
images

उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे घसरले….

मुंबई ,दि. ११ जुलै ;

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने त्यांच्यावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे यांना भाजपा ‘ईट का जबाव पत्थर से’ देईल असा इशारा देत फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत तर, उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे, अशा एकेरी भाषेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

 

बावनकुळे पुढे म्हणाले,”यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल. “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलेय, पुढचे आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, अशा शब्दात त्यांना स्पष्ट इशारा दिला.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी डेटा तयार केला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकविले व परत मिळवून दिले. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे नेटवर्क देवेंद्र फडणवीस यांनी उभारले . महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. राज्यात लोड शेडिंग कमी करण्यासाठी योजना राबविली. एक रुपयांत पीक विमा योजना आणली. महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार केला. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे.

 

उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, त्यापुढे माझा कॅमेरा, माझी पत्नी. वयाच्या ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री, माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा असून तेच ‘कलंक’ आहेत, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, ठाकरेनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.. बरेच कलंकित कामे केली.

 

संभाजीनगर, धाराशीव, अहिल्यादेवीनगर अशी नावे देऊन अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचविणारे देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही अशांची साथ देणारे कलंकित व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान कॉंग्रेस करीत असताना त्यांचा विचार, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे व पुढच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस काम करणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस असून, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे कलंकित करंटे आहेत. नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्यांच्या प्रेमी पडलेल्या लोकांना तरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *