संत, सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र महान राज्य.
संत, सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र महान राज्य.
मुंबई, दि. ७ जुलै ;
समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोर्हे, राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, गायिका आशा भोसले, उद्योजिका राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या स्वातंत्र्याच्या मंत्राचे स्मरण केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून संगीत क्षेत्रातील पं. भातखंडे, पलुस्कर यांच्यापासून किशोरी आमोणकर व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या योगदानाचा देखील उल्लेख केला.
