देशात नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही !

0
IMG-20230704-WA0170

देशात नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही !

अमदनगर, दि. ५ जुलै ;

भारताकडे पूर्वी तुच्छतेने पाहिले जायचे परंतु आज कुठेही गेलात तरी भारताकडे सन्मानाने पाहिले जाते याचे सारे श्रेय पंतप्रधान मोदींना आहे, हा आपला अभिमान आहे. आज जगातील लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींकडे पाहिले जाते. ९ वर्षात मोदींनी देशाची प्रतिमा बदलली आहे म्हणून त्यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचे आहे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असे भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

‘मोदी @९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत अहमदनगरच्या पाथर्डी येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आणि या अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब राजळे सभागृह येथे ‘लाभार्थी मेळावा’ पार पडला. यावेळी दरेकर बोलत होते.

मेळाव्यात बोलताना दरेकर म्हणाले की, ९ वर्षांपूर्वी या देशाला मोदींच्या रूपाने पंतप्रधान लाभला. ९ वर्षांपूर्वी लोकांच्या आशा गेल्या होत्या. देशात भविष्यात काय होईल अशा प्रकारची उमेद हरपली होती. आपल्या देशातील जनतेच्या आशीर्वादाने मोदींसारखा नेता पंतप्रधान म्हणून लाभला व लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. गेले ४० ते ४५ वर्ष जे होऊ शकले नाही त्यामुळे देशातील जनता निराश झाली होती. ९ वर्षाच्या कालावधीत ४० वर्षापेक्षा डबलगतीने काम करण्याचे कार्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. आज केंद्राच्या माध्यमातून देशात विकासकामे, प्रकल्प येत आहेत. परंतु तुम्हाआम्हाला जो अभिमान लागतो तो जपण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे.

दरेकर यांनी केंद्र व राज्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच कोरोना काळात देशासह संपूर्ण जगाला लसीच्या माध्यमातून जीवनदान देण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून झाल्याचेही दरेकर म्हणाले. त्याचबरोबर सरकार नीट काम करत असेल तर ते काम जनतेपर्यंत पोचविण्याचे आपले कर्तव्य असल्याचेही दरेकरांनी सांगितले.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचेही पाथर्डीवर बारीक लक्ष आहे. त्यांनीही अनेक विकासकामे केली आहेत. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आले. त्यांनीही कधी नव्हे तेवढा निधी पाथर्डीला दिला. या राज्यात अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार होते. राज्याचा मुख्यमंत्री मातोश्री सोडून मंत्रालयात कधी गेला नाही. जनतेची कामे खोळंबली होती. मग निर्णय घ्यावा लागला हे सरकार पाडले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी निर्धार केला व शिंदे-फडणवीस सरकार आले. कारण उद्धव ठाकरेंच्या आमदारांनाही समजले होते मुख्यमंत्र्यांकडून कामे होत नाहीत. मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही. जर सरकार बदलले नाही तर महाराष्ट्र मागे जाईल. ही भुमिका घेऊन आपले सरकार आले.

या राज्याला विकास, योजना हव्यात. राज्य अधोगतीकडे जात आहे. मी मुख्यमंत्री झालो नाही तरी चालेल. जनतेचे राज्य हवे आहे. म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले व आपले सरकार आले. पदे येतात आणि जातात. परंतु आपली बांधिलकी जनतेशी असली पाहिजे. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही तालुक्याचा कायापालट भाजपा करू शकते. भाजपाशिवाय कुठल्याही पक्षाला आपल्याबाबत संवेदना नाहीत. येथे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आले आहेत. आपला आशीर्वाद तर हवाच आहे. पण जिथे जिथे सांगता येईल तिथे सांगा देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही दरेकर यांनी लाभार्थीना केले. तसेच पाथर्डीतील कार्यकर्त्यांत पारिवारिक वातावरण आहे. पाथर्डी, शेवगाव येथे चांगले काम होईल. विविध विकासकामे, प्रकल्प, योजना आणून या दोन्ही तालुक्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *