सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्याचा प्रयत्न करा.

0
IMG-20230701-WA0158

सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्याचा प्रयत्न करा.

पुणे, दि.३ जुलै :-

जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

एनडीए रस्त्यावरील बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर, पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार उपस्थित होते.

 

वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीतील पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाची आहे. वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड करुन मानवाने वन्यप्राण्यांना उपेक्षित केले आहे. निसर्गरम्य ठिकाणी या उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली असून येथे सुमारे चारशे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे अडोतीस कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भारताने वन व्यवस्थापनाचा आदर्श जगाला दिला आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. ‘जिथे वन तिथे जीवन’ असल्याने वृक्षारोपणासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *