गैरव्यवहारांची चौकशी सुरु झाल्यानेच ‘तो’ मोर्चा !

0
IMG-20230522-WA0064

गैरव्यवहारांची चौकशी सुरु झाल्यानेच ‘तो’ मोर्चा !

मुंबई, दि. २ जुलै:

कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडी कडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र जनता त्यांच्या या भूलथापांना फसणार नाही. या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे, खरा मोर्चा मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान काढण्याची खरी गरज होती, कारण जो काही गैरव्यवहार झाला आहे तो याच ठिकाणी झाला आहे, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चढवला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युवासेनेच्या कोअर कमिटीचे राहुल कनाल व वर्धा जिल्ह्यातील करंजा नगरपरिषदेतील १० नगरसेवकांच्या प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

समृध्दी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोविड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले, सदोष ऑक्सिजन प्रकल्पामुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडे सहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या ३२५ ला बॅग घेतली. काहीजण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. ठाण्यात कोविड कालावधीत आम्ही १२०० बेडचे रुग्णालय महापालिकेच्या निधीशिवाय उभारले, मोफत रेमडेसिवीर वाटले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे, ही चौकशी आम्ही लावली नाही, मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते २० वर्षापूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

महापालिकेच्या कायम ठेवी (फिक्स डिपॉझिट) जनतेच्या कामांसाठी असतात, त्या कोणाच्याही कुटुंबियांच्या खासगी ठेवी नाहीत. आमचे सरकार आले तेव्हा ७७ हजार कोटी एफडी होत्या त्यामध्ये वाढ होऊन त्या आता ८८ हजार कोटी झाल्या आहेत. मात्र विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. गेल्या १५-२० वर्षांत हे पैसे कोठे जात होते याची चौकशी केली जात आहे. दरोडा घालणारे चोरीची भाषा करु लागले आहेत, हा चांगला बदल आहे. सत्य बाहेर येण्याची गरज, सत्याला सामोरे जाण्याची गरज आहे. मोर्चे काढून लोकांना तुम्ही यापुढे फसवू शकणार नाही, मुंबईकरांना सुविधा देण्याचे काम आपले सरकार महापालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढील २ वर्षात खड्डे मुक्त मुंबई करणार, सर्व रस्ते सिमेंट क्रॉंकिटचे करणार, तुम्ही आरोप करत रहा आम्ही कामातून उत्तर देणार. शिवसेना भाजप युतीचे सरकार हे सर्वसामान्यांसाठी स्थापन झालेले सरकार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत इगो,अहंकार,वैयक्तिक स्वार्थामुळे काही प्रकल्प थांबवले गेले. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. शेतकरी, महिला, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, तरुणांसाठी विविध योजना अंमलात आणल्या.

सर्वांना मोफत आरोग्य सेवा राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी सव्वा लाखांची योजना वाढवून मर्यादा पाच लाखांवर नेली आहे. आतापर्यंत योजनेचा लाभ केवळ केशरी रेशन कार्ड धारकांना होता आता राज्यातील सर्व जनतेला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळेल. सोबत केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे पाच लाख मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

डबल इंजिनचे सरकारचे काम जोरात सुरु आहे. शासन आपल्या दारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दररोज लोकाभिमुख निर्णय घेत आहोत. शिवसेनेत दररोज प्रवेश सुरु आहेत. येथे कामाला संधी आहे. कोविड काळात घरी बसून राहिले, केवळ भाषणाने रेशन मिळत नाही. कोविड काळात सर्व घाबरुन घरात बसले होते, ज्यांच्यात हिंमत होती ती रस्त्यावर उतरुन काम करत होते, त्यामध्ये राहुल कनालचा समावेश होता. आपल्यासाठी सर्व जगतात, दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरतो तोच खरा नेता असतो. कोविड मध्ये केवळ भाषण देऊन रेशन मिळत नाही, असा टोला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *