पवार म्हणतात, “जो प्रकार घडला त्याची चिंता नाही” !

0
pawar 44

पवार म्हणतात, “जो प्रकार घडला त्याची चिंता नाही” !

पुणे, दि. २ जुलै:

पंतप्रधानांनी एक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला असून राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागाचा त्यांनी उल्लेख केला. आज मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या काही लोकांना भाजपाने शपथ दिली याचा अर्थ पंतप्रधनांनी केलेले आरोप वास्तव नव्हते व या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्यावर आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केले. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्या लोकांनी पक्षाची जी भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीत संघटनात्मक बदल करण्याचे जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याचा विचार करणार होतो. जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यापूर्वीच काही लोकांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत हे मांडले.पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचे चित्र दोन – तीन दिवसात लोकांसमोर येईल. ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्हाला यातील काही कल्पना नाही. आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे ती कायम आहे. याचा खुलासा माझ्याकडे केला आहे. यावर मी आताच काय बोलू इच्छित नाही याचे स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यावर माझा विश्वास बसेल आणि मांडले नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन.

पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न असेल तर आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल मला नवीन नाही असे स्पष्ट सांगतानाच शरद पवार यांनी १९८० साली निवडणूकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते आणि एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले तर सगळे मला सोडून गेले. त्या ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो त्याऐवजी मी पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. माझा उद्देश होता की पुन्हा पक्षाची बांधणी करायची आणि पाच वर्षांने निवडणूक झाली त्या निवडणुकीत आमची संख्या ६९ वर गेली. पाच जणांचा नेता असतानाही संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी चार सोडले तर सगळे पराभूत झाले ही आठवण आणि घडलेला प्रसंगही शरद पवार यांनी सांगत पक्षाची रणनीती काय असणार आहे हे स्पष्टपणे अधोरेखित केले.

मागची निवडणूक झाली त्यावेळीसुध्दा असेच चित्र होते. पण संबध महाराष्ट्रात जाऊन आपली भूमिका मांडण्याचे काम केले आणि त्याचा परिणाम आमची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि यश मिळाले व संयुक्त सरकार स्थापन केले. आता पुन्हा तीच स्थिती आहे. आज मला देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन आले. या सगळ्या स्थितीत आपण एक आहोत. अशाप्रकारच्या भूमिका लोक मांडत आहेत. आता इथे येण्याअगोदर अनेकांचे फोन आले. या देशात एक पर्यायी शक्ती उभी करावी याची आवश्यकता आहे असे म्हणणारे या सर्वांची ही भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडला त्याची मला चिंता नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कराडला यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *