‘मराठा मंदिर’ने महाराष्ट्राचे शैक्षणिक विश्व समृद्ध केले..   

0
IMG-20230616-WA0069

‘मराठा मंदिर’ने महाराष्ट्राचे शैक्षणिक विश्व समृद्ध केले..

मुंबई, दि. २५ जून :

स्वातंत्र्यपूर्व काळात उद्दात हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता, कामातील सातत्य आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, संजय राणे, शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या, स्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे. मराठा मंदिरच्या अमृत महोत्सवी वाटचालीस आणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *