बिहारची जनता पाखंडी लोकांना साथ देणार नाही !
बिहारची जनता पाखंडी लोकांना साथ देणार नाही !
मुंबई, दि. २५ जून :
काँग्रेसने परिवार वाचविण्यासाठी देशावर आणिबाणी लादली होती आणि आजही आपआपला परिवार वाचविण्यासाठी बिहारमध्ये एकत्र येत आहेत. जे लालूप्रसाद यादव, नितिश कुमार आणि मुलायम सिंह आणिबाणीच्या विरोधात लढले तेच आज कॉंग्रेसच्या परिवारवादाला साथ देत आहेत पण बिहारची भूमी ही क्रांतीची भूमी आहे, ती यांचा पाखंडीपणा मान्य करणार नाही, बिहारची भूमी ही नागरीकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारी, मान, मर्यादांची भूमी आहे, ती यांच्या पाखंडीपणाला साथ देणार नाही अशी टीकाकेंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली.
मुंबई भाजपातर्फे वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आणिबाणीचा निषेध करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
एकिकडे लोकशाहीच्या नावाने हे सगळे पक्ष गळा काढतात तर दुसरीकडे घराणेशाही वाचविण्यासाठी एकत्र येऊन लोकशाहीचाच गळा घोटण्याचे काम करीत आहेत, अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांना देश तर माफ करणार नाहीच पण बिहारमधूनही यांचा येत्या काळात सुपडा साफ हाईल, असा विश्वास भूपेंद्र यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्या घटनेच्या मुळ गाभ्याला धक्का लावून कॉंग्रेसने या देशावर आणिबाणी लादली, हा या देशाच्या घटनेचा अपमान तर होताच तसाच तो लोकशाहीचा आणि घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान करण्याचे काम कॉग्रेसने केले. एवढेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देतानाही कॉंग्रेसने असेच केले होते.
मी विदर्भातील अनेक भागात दौरा करुन कार्यक्रमासाठी आलो आहे, समाजातील विविध घटकांशी आम्ही संवाद साधला आहे, प्रत्येकजण मान्य करतोय की, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपाला धोका दिला होता. त्यामुळे आताच्या शिंदे- फडणवीस सरकारला प्रचंड जनसमर्थन महाराष्ट्रात मिळते आहे असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणीचा काळ आणि काँग्रेसने केलेले अत्याचार यावर सविस्तर विवेचन केले.
