आता बास्स, अमित शहांची भेट घेऊन त्यांच्याशीच बोलणार !
आता बास्स, अमित शहांची भेट घेऊन त्यांच्याशीच बोलणार !
परळी वैजनाथ, दि ०३ जून ;
माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली. त्यामुळे जी परिस्थिती आणि संभ्रम निर्माण झाला तो माझ्यामुळे निर्माण केलेला नाही. आता मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी मनमोकळी चर्चा करणार असून अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे, असे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितले.
गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावरून त्या बोलत होत्या.
पंकजा यांनी तोफ डागत पुढे म्हणाल्या, कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही. मी लोकांसाठी राजकारणात आहे. बहुजनांच्या, वंचितांच्या , समाजहिताच्या भुमिका घेतल्या तर त्यात चुकीचं काय आहे. मला भुमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छातीठोक भुमिका घेईल. रडगाणं गाणारी मी नाही. मला या चर्चांचा कंटाळा आला आहे. तरीही संयम ठेवू. मी लोकांसाठी राजकारणात आहे. मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही. आपली कोणावरही नाराजी नाही. आपली अपेक्षा सर्व सामान्य माणसाकडून आहे. वेळ येईल तेंव्हा तुम्ही ती अपेक्षा नक्कीच पुर्ण कराल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जातायत. याने कोणी व्यथित होऊन जाण्याची गरज नाही. सत्य सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे.मला भुमिका घ्यायची असेल तर ती छातीठोक व जगजाहीर घेईन.
आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडेवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे.एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करते तेव्हा ती व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलते. पण जर एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असते, त्या भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाहीत. याची मला सवय झाली आहे पण ते प्रेम समजून मी स्विकारते असे मुंडे म्हणाल्या.
