नवी दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारू.
नवी दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारू.
रायगड, दि. २ जून :
शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासून करण्यात आला आहे.
