दुग्धविकास मंत्र्यांवर गुन्हा कधी?
मुंबई, दि. २९ ऑगस्ट २०२०:
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करताना पोलिसांनी राजू शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मग दुधाचा धंदा परवडत नाही म्हणून ज्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्यांना जबाबदार धरुन राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे पोलिसांना का वाटले नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता मग राहुरीचा शेतकरी रेवनाथ काळे याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली या आत्महत्येस जबाबदार कोण? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
पोलिसांना जे काय करायचे ते त्यांनी करावे, सरकारला जे काय करायचे ते करावे, जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.
दुधदर, दुधावरील जीएसटी रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे दुधदर आंदोलन सुरु केले आहे. आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला, असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले.
दूध उत्पादक शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला ठाकरे सरकारला वेळ नाही.
