सदाभाऊ खोतांच्या ‘शेतकरी वारी’ला प्रविण दरेकरांची भेट…

0
IMG-20230524-WA0044

सदाभाऊ खोतांच्या ‘शेतकरी वारी’ला प्रविण दरेकरांची भेट…

सातारा, दि. २४ मे ;

शेतकरी यात्रेला वारी एवढ्यासाठी म्हटले आहे की पांडुरंगाकडे जाताना वारी केली की विश्वास असतो पांडुरंग पावेल तसाच विश्वास शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वसामान्य लोकांचा आहे. सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध असून ज्या मागण्या सदाभाऊ खोत करतील त्या सरकार पूर्ण करेल असा विश्वास भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा ‘शेतकरी वारी’ पदयात्रा सुरु आहे. या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून भेट दिली.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, सदाभाऊंचे शेतकरीविषयी असणारे प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या शेतकरी नेत्याला राज्याचे कृषी राज्यमंत्री पद दिले. कुठलेही सरकार असो शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवू शकले नाहीत. त्यामुळे आजही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हा देश कृषीप्रधान देश आहे. ६० टक्के लोकं आज शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी, बळीराजा पिकं पिकवतो म्हणून उद्योगपती, उद्योजक खाऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. मीही नांगरणी, पेरणी केली आहे. त्यामुळे माझ्या संवेदना शेतकऱ्यांप्रती आहेत. शेतकऱ्यांचा माल शहरात नेऊन संत शिरोमणी आठवडी बाजार सुरु झाला होता. तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी आहे. या राज्यात शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या संवेदना जाणारे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई शहरात हा आठवडी बाजार सुरु करून घेऊ असे आश्वासन आ. दरेकर यांनी दिले.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना उसापासून इथेनॉल परवानगी द्या ही मागणी आहे. त्यात काय अडचण आहे. जर कारखान्यांना इथेनॉलची परवानगी देणार असू व फार्मर्सने एकत्रित येऊन केलेल्या प्रोड्यूसर कंपन्या इथेनॉल निर्मितीसाठी पुढे येणार असतील तर ही मागणीही आग्रहाने शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन या आश्वासनासोबत दरेकर यांनी ऊस उत्पादक, वाहतूकदार यांचा प्रश्न नक्की उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडेन, असेही सांगितले.

शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे असेल तर जिल्हा बँक, अर्बन, नागरी सहकारी बँका पैसे देतात. परंतु ज्या मोठ्या बँका आहेत. खासगी, राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांना सरकारची मदत असते. परंतु याच बँका नियमाच्या शंभर अटी घालून सिबिल दाखवल्याशिवाय कर्ज देत नाहीत. अशा प्रकारच्या ज्या जाचक अटी आहेत त्याही काढून बळीराजाला सहज कर्ज कसे देता येईल यासाठी आग्रही भुमिका घेऊ, असा विश्वासही आ. दरेकर यांनी उपस्थितांना दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *