महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारमुळे परिवर्तनाला सुरुवात.
महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारमुळे परिवर्तनाला सुरुवात.
मुंबई, दि १८ मे.
महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार असताना प्रत्येक विकास कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम करण्यात येत होते, मात्र आता शिंदे -फडणवीस सरकारमुळे विकासाला गती मिळाली असून या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात परिवर्तन होते आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबई विमानतळावर जे. पी. नड्डा यांचे आगमन झाले तिथे मुंबई भाजपातर्फे त्यांचे ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
मुंबई दौऱ्याची सुरुवात सायन – पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करून करण्यात आली. केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती दिल्यानंतर मागील काळात राज्यात आलेल्या आघाडी सरकारमुळे या योजना रोखण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात डबल इंजिनचे सरकार आले असून महाराष्ट्र आता गतिमान झाला आहे आणि महाराष्ट्रात आता पुन्हा परिवर्तनाला सुरुवात झाली आहे असा विश्वास ही व्यक्त केला.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जे पी नड्डा म्हणाले की भाजपामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते हे अत्यंत भाग्यवान आणि नशीबवान आहेत कारण भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जगविख्यात नेतृत्व आपल्या पक्षाकडे आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि 2047 पर्यंत आपला देश आपणाला एक विकसित देश म्हणून पुढे आणायचा आहे. अमृत काळामध्ये आपण सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत ज्या क्षणांची इतिहासात नोंद होईल अशा कालखंडाचे आपण साक्षीदार आहोत तर दुसरीकडे सर्वच पक्ष परिवारवादी आहेत ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे नियत नाही ज्यांच्याकडे नियत आहे त्यांच्याकडे ताकद नाही अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे आपल्याकडे नेता आहे नीती आहे आणि नियती आहे बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत तर भाजपा विकासवादासाठी काम करतो आहे.
