महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होणे चिंतेची बाब..

0
images - 2022-12-11T210627.720

महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होणे चिंतेची बाब..

मुंबई, दि. १६ मे –
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी.

महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन – दोन नेते समितीत काम करतील. यासोबतच इतर सर्व मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले जाईल.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप सीबीआयच्या कारवाईनंतर खरे ठरत आहेत. भाजप त्यावेळी समीर वानखेडे यांचे समर्थन करत होते त्यावरुन भाजपचा स्वभाव समजतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

शरद पवारांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *