राज ठाकरे फुले, शाहू,आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत ?
राज ठाकरे फुले, शाहू,आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत ?
नाशिक,दि. ७ मे :-
छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचे फार मोठं काम केलं आहे म्हणून शरद पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव घेण्यात वावगे काय आहे, शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाहीत असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.
राज ठाकरेंचा समाचार घेत छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांसोबत मी ९१ सालापासून आहे. पवार हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवारांची प्रकट मुलाखत घेतली त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवारांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे. महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले.
फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठे योगदान दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात. दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी अस उत्तर पवार साहेबांनी राज ठाकरे यांना दिल असल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.
प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडत कुठे अशी टिपणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.
