20200828_193211

मुंबई, दि. २८ ऑगस्ट :

लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांनी भरमसाठ वीज बिलं पाठवल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता. लोकांचा संतोष पाहून वीज बिलामध्ये सवलत देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली होती परंतु वित्त विभागाने या प्रस्तावाला नकार दिल्याने सरकारने जनतेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रश्नी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भरमसाठ वीज बिलांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती परंतु महाविकास आघाडी सरकारने तसे करण्यास नकार दिला. भाजपच्या आंदोलनानंतर व जनतेच्या रोषानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री वीज बिलात सवलत देणार अशा घोषणा करत होते त्या घोषणा फसव्या होत्या हे आता स्पष्ट झाले आहे.

वीज बिलात सवलत देण्यासाठी १००० कोटी रुपये लागतात हा निधी देण्यास राज्याच्या वित्त विभागाने नकार दिल्याचे उघड झाले आहे. वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचेही भातखळकर यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या खोट्या घोषणांना भाजपा व जनता फसणार नसून ३०० युनिटपर्यंत सरसकट वीजबिले माफ झाल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *