नागपुरात अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी प्रस्ताव.

0
20200828_183604

मुंबई, दि 28 ऑगस्ट  :

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इंदोरा, कामठी रोड नागपूर येथे 568 खाटांचे रुग्णालय, अतिविशेषोपचार रुग्णालय, नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून यामुळे मध्य भारतातील गरीब रुग्णांना आरोग्याचा लाभ घेता येईल व नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे.

सध्या विदर्भासह संपूर्ण मध्य भारतामध्ये काही अंशी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम देणारी एकमेव संस्था म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय ही वैदयकीय शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था आहे. संपूर्ण विदर्भाचा व मध्य भारताचा विचार केल्यास अतिविशेषोपचार सुविधा अपुऱ्या असल्यामुळे पर्यायाने गोरगरीब व सर्व सामान्य रुग्णास खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ संस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश सदर प्रस्तावात करण्यात आलेला आहे. विदर्भ व मध्य भारतामध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थांची कमतरता या संस्थेमुळे भरून निघेल. तसेच अतिविशेषोपचाराची सुविधा व्यापक प्रमाणात स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहे तर प्रस्तावित पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्त रोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमरजन्सी मेडिसिन इत्यादी सतरा अभ्यासक्रम प्रस्तावित आहे.

नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 1400 तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 883 खाटाची सोय आहे. परंतु नागपूरची वाढती लोकसंख्या, वाढते अपघात व दूरदूरची अंतरे यामुळे या सुविधाही नागपूर शहर व लगतच्या भागासाठी कमी पडत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूर ही संस्था इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेच्या अधिपत्याखाली येत असल्याने व या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे विशेष उपचार व अतिविशेषोपचार या दोन्ही सुविधा उपलब्ध होणार आहे व याचा लाभ इंदिरा गांधी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या दोन्ही संस्थेला सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या होणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे 2005 पासून बाह्य रुग्ण विभाग कार्यरत असून दररोज 400 ते 500 रुग्ण सेवा घेतात. परंतु या ठिकाणी आजमितीस आंतररुग्ण सेवेसाठी इमारत व सोयी नसल्याने आजारी रुग्णांना इंदिरा गांधी वैदयकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. या संस्थेच्या उर्वरित जागेत रुग्णालयाचे बांधकाम केल्यास आंतररुग्णाचा प्रश्न सुटू शकतो. एकूण 7.56 एकर जागेवर भव्य व आधुनिक पद्धतीची इमारत बांधण्यात येणार असून यासाठी अंदाजे 917 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे 8.5 एकर जागेत अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व सोयी सुविधा युक्त निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. यात बगीचे, खेळाचे मैदान व सभागृह बांधण्यात येणार आहे. तसेच या परिसरात परिचर्या कॉलेज व पॅरामेडिकल कॉलेज उभारण्यात येणार असून कामठी रोड परिसरात उपलब्ध शासकीय जागेचा यासाठी वापर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *