शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश होणार..
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश होणार..
मुंबई, दि. २५ एप्रिल :
कृषि विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला.
कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषि शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. तर मंत्री केसरकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल रुची निर्माण होईल, या पद्धतीने असावी.
