BMC च्या ६ स्विमिंग पुलामध्ये मिळणार पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.
BMC च्या ६ स्विमिंग पुलामध्ये मिळणार पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.
मुंबई, दि. २३ एप्रिल;
‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे ६ तरण तलाव मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ जलतरण तलावांमध्ये येत्या २ मे २०२३ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुस-या कालावधीचा प्रारंभ दि. २३ मे पासून होणार आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठीची लिंक *मंगळवार, दिनांक २५ एप्रिल* पासून कार्यान्वित होणार आहे. यासाठीची नोंदणी ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश’ या पद्धतीने दिली जाणार असल्याने इच्छुकांनी आपला प्रवेश शक्य तेवढ्या लवकर घ्यावा, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त किशोर गांधी यांनी सांगितले की, मुंबईत विविध खाजगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी साधारणपणे ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क असते. तथापि, या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार माफक शुल्कात म्हणजेच पंधरा वर्षांपर्यंत रुपये २ हजार, तर त्या पुढील वयोगटासाठी रुपये ३ हजार एवढ्या माफक शुल्कात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारे जलतरण प्रशिक्षण हे २१ दिवसांचे असणार आहे. याचाच अर्थ खाजगी संस्थांच्या तुलनेत शुल्क कमी; आणि प्रशिक्षणाचे दिवस जास्त असणार आहेत, असेही गांधी यांनी आवर्जून नमूद केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील सातत्याने घेत असते. याच काळजीचा एक भाग म्हणजे महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या क्रीडा विषयक सोयी-सुविधा याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ६ जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या जलतरण तलावांमध्ये दि. २ मे २०२३ ते दि. २२ मे २०२३ आणि दि. २३ मे २०२३ ते दि. १२ जून २०२३ या कालावधीत दरम्यान जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रशिक्षण कालावधींमध्ये व ६ जलतरण तलावात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात साधारणपणे ६ हजार प्रशिक्षणार्थींना नोंदणी करता येणार असून यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिकांना जलतरणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली आहे.
जलतरण प्रशिक्षण हे दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये २१ दिवस आयोजित केले जाणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे १५ प्रशिक्षणार्थींच्या मागे प्रत्येकी एक प्रशिक्षक असणार आहेत. या प्रशिक्षणासाठी पंधरा वर्षे वयापर्यंत रुपये २ हजार, तर त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी रुपये ३ हजार इतके शुल्क आकारले जाणार आहे. तथापि, दिव्यांग सभासदांना रुपये २ हजार इतकी शुल्क आकारणी केली जाणार आहे, असेही वैशंपायन यांनी कळविले आहे.
