स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा..

0
IMG-20230409-WA0154

स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा..

चंद्रपूर, दि. १० एप्रिल :

देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा आणि महापुरुषांचा अवमान करण्याची काँग्रेसची प्रथाच आहे. स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या या काँग्रेसला आता धडा शिकविण्याची वेळ आलीय, असे टीकास्त्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडले.

सावरकर गौरव यात्रेदरम्यान आयोजित मशाल यात्रेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा महानगरचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगरचे महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, दिनकर सोमलवार, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशा भ्रष्ट लोकांची डोकी ठिकाणावर आणण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. सावरकरांवर विनाकारण टीका करणाऱ्यांचा मेंदू आणि बुद्धी ठिक व्हावी अशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. इतिहासातील सत्य परिस्थितीवर जो नीच शब्दात टीका करतो त्याला भविष्य कधीही माफ करीत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

राहुल गांधी नेहमी म्हणतात की ते सावरकर नाहीत. ही बाब अगदी सत्य आहे. अनेक जन्म घेतले तरी राहुल गांधी सावरकर होऊच शकत नाही. ईतकेच काय तर ते गांधी देखील नाही. परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राहुल विंची असे नामांतर केले होते. जो व्यक्ती आपल्या नावाशी एकनिष्ठ राहु शकत नाही. त्याला राष्ट्रभक्ती काय कळणार असा कणखर सवालही ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नावच नाही तर ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणास्थान आहे. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्यांचे ते ऊर्जास्थान आहे, असे मुनगंटीवार ठामपणे म्हणाले.

चाफेकर बंधुंना फाशी देण्यात आली त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अस्वस्थ झाले. त्यांचा जीव कासावीस झाला. त्यावेळी कमी वयातच सावरकरांनी कुलदेवतेसमोर शपथ घेतली की आपले आयुष्य ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करतील. हे सावरकर राहुल गांधी यांना कधी कळुच शकत नाहीत, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. परंतु सावरकर जगातले एकमेव असे स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांना मातृभूमीसाठी लढताना दोनदा जन्मठेपेंची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेमध्ये अमानुष अत्याचार सावरकरांवर करण्यात आलेत. अन्याय सहन करूनही स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी लढा दिला, हे राहुल गांधी यांना दिसत नाही. त्यामुळे इतिहासावर अपशब्द काढणाऱ्या काँग्रेसला आता धडा शिकवा असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *