गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?
गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?
मुंबई, दि. १६ मार्च;
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांना एक कोटी रुपयाची लाच ऑफर केल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस व त्या संबंधित परिवाराशी जुने संबंध असून फडणवीस मुख्यमंत्री असतानापासूनचे त्यांचे संबंध आहेत. सत्तेत असताना व सत्तेत नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा व ज्यांच्यावर ब्लॅकमेल केलेल्या आरोप केला आहे त्या कुटुंबाचा संबंध होता असे खुद्द फडणवीसच सांगत आहेत. यामागे काही राजकीय नेते व पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे,त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी व वस्तुस्थिती जनतेसमोर आणावे.
