फडणवीसांच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

0
fadnavis- 12

फडणवीसांच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

मुंबई, दि. ९ मार्च:

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असून शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा व पर्यावरणपूरक विकास ही पंचामृत ध्येय आहेत.

शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता १२ हजार रुपयांचा सन्माननिधी देण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार असून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा काढता येणार आहे. राज्य सरकारच वीम्याचा हप्ता भरणार आहे. 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणार आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा व्यापक विस्तार

करून मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देण्यात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करत त्यांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये व अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 20,000 पदे भरली जाणार आहेत.

मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार असून गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण ते तळोजा असे नवे मार्ग असतील तर नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल बांधले जातील. गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

देण्यात येतील. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी तर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय व शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *