माझे नाव, धनुष्यबाण चोराल पण ते तुम्हाला पेलवणार नाही !

0
UT khed 1

माझे नाव, धनुष्यबाण चोराल पण ते तुम्हाला पेलवणार नाही !

खेड, रत्नागिरी, दि. ६ मार्च:

शिवसेनेची स्थापना निवडणुक आयुक्ताच्या वडिलांनी नाही माझ्या वडिलांनी केली आहे. शिवसेना कोणी चोरु शकत नाही,निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. निवडणुक आयुक्तांना मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना बघायला या. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणुक आयोग नाही, माझे नाव, धनुष्यबाण चोराल पण ते तुम्हाला पेलवणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

खेड येथील गोळीबार मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली त्यावेळी ठाकरे बोलत होते. एकनाथ शिंदे व भाजपावर हल्लाबोल करत ते पुढे म्हणाले की, गुजरातला पटेल चोरले, बंगालमध्ये सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेब चोरले. चोराला, या वृत्तीला मत देणार का?  तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. जनता जे ठरवेल ते मान्य. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही.

भाजपाला गल्लीतले कुत्रेही विचारत नव्हते पण त्यांना सोबत दिली तेच आज शिवसेनेला संपवायला निघालेत. ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नौकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे नव्हते. मी घरात बसून पण महाराष्ट्र सांभाळला तुम्ही दिल्ली समोर मुजरे करत बसलात. माझ्या सोबत महाराष्ट्र होता. आपले जागतिक कौतुक झाले ते माझे नाही महाराष्ट्राचे कौतुक आहे.गुजरातच्या निवडणुका म्हणून महाराष्ट्रातले उद्योग पाठवले. महाराष्ट्र हे माझे कुटुंब म्हणूनच माझं कुटुंब माझी जबाबदारी, आहेच. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलले तो गतिमान महाराष्ट्र नको आहे.

राजन साळवींचा छळ सुरु आहे, ते देशद्रोही नाहीत. देशद्रोही कसे म्हणता?  १९९२-९३ साली मुंबई वाचवणारे यांना देशद्रोही वाटतायत. केंद्रीय यंत्रणांच्याबाबतीत विरोधी पक्षांनी तक्रार केली आहे. तुमच्या पक्षात घेतले की ते स्वच्छ होतात. विरोधी पक्षात असले की गुन्हेगार. पूर्वी यांच्या व्यासपीठावर साधू दिसायचे आता संधीसाधू दिसतात.

हीच खरी वेळ कान्होजी कोण आणि खंडोजी खोपडे कोण बघायची. जेधेंनी महाराजांना सांगितले मी सगळ्यावर पाणी सोडले पण स्वराज्याशी द्रोह नाही. आज खंडोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतात. राजन, वैभवची काय संपत्ती आहे? यांच्या मागे लागता. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ठाकरेंची सहावी पिढी अभिमानाने काम करतेय. कसब्यात साफ झाले. अंधेरीत तर लढायची हिंमत नाही झाली. मेघालयात शहांनी संगमांवर जोरदार आरोप केले. निकालात संगमांनी यांना चित केले. घराणेशाहीचे, भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या सोबत सत्ता स्थापन करताहेत. भाजपने संगमांचे काय चाटले? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *