अनुसूचित जातीतील आरक्षणाचे ‘अबकड’ वर्गीकरण व ‘आर्टी’ची स्थापना करा:

0
IMG-20230222-WA0125

अनुसूचित जातीतील आरक्षणाचे ‘अबकड’ वर्गीकरण व ‘आर्टी’ची स्थापना करा:

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी;

सकल मातंग समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात एल्गार पुकारला. राज्यभरातून मातंग समाजाचे हजारो लोक आझाद मैदानावर एकवटले होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आरक्षणाचे ‘अबकड’ वर्गीकरण करावे तसेच बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे समन्वयक व प्रसिद्धी प्रमुख सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला २०११ पासून १० वेळा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाबाबत अभिप्राय मागूनही अद्याप महाराष्ट्र सरकारने अभिप्राय कळविला नाही. यावरून महाराष्ट्र सरकार वंचित जातींना न्याय देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा या राज्यांनी वंचित जातींना न्याय दिला परंतु पुरोगामी महाराष्ट्रात वंचित जाती न्यायापासून आजही दूर आहेत. सारथी, महाज्योती, बार्टीच्या धर्तीवर मातंग व तत्सम जातीसाठी आर्टीची (अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) स्थापना करावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आझाद मैदानावरील या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे गटाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावून सकल मातंग समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. मातंग समाजाच्या मागण्यांचा विचार करून न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले. काँग्रेसच्यावतीने आमदार राजेश राठोड, आ. जितेश अंतापूरकर, रविंद्र दळवी, विजय आंभोरे तर शिवसेनेच्या वतीने खासदार अरविंद सावंत, पक्ष प्रतोद अजय चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शंभूराज देसाई व मंत्री अतुल सावे, भाजपाचे आमदार प्रसाद लाड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आरक्षण वर्गीकरण लढ्याचे नेते मंदाकृष्णा मादीगा यांनी आझाद मैदानात सकल मातंग समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली.

जवाब दो या आंदोलनासाठी सकल मातंग समाजाच्या विविध संघटना, पदाधिकारी यांनी सक्रीय भाग घेत आंदोलन यशस्वी केले. या कामी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनीही पाठिंबा देत मातंग समाजाच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *